माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे

माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे



उदगीर : आगामी विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार राहणार आहे सांगत माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी 'माझं ठरलंय' एवढीच भूमिका आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. 

मागच्या अनेक दिवसांपासून  भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे हे उदगीर विधानसभा निवडणुक लढविणार असल्याची चर्चा उदगीर मतदार संघात चालू आहे. रविवारी माजी खासदार  सुधाकर शृंगारे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी करण्यासाठी उदगीर शहरात अनेक कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेतल्या. रात्री ते रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी उदगीर येथील रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा केली.  यावेळी दक्षिण मध्य रेल्वे बोर्ड सल्लागार समितीचे सदस्य मोतीलाल डोईजोडे उपस्थित होते.

यावेळी आमच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना ऊत्तर देताना माजी खासदार सुधाकर शृंगारे म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षातच सध्या सक्रिय असून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल मी कोणालाही आज दोष देणार नाही. याबाबत योग्य वेळी बोलणार असल्याचे सांगितले. आपण अजून कुठल्याही पक्षात गेलो नसून भारतीय जनता पक्षात सक्रिय असुन पुढे काय करायचे त्याचा निर्णय ही योग्य वेळी घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

आगामी विधानसभा निवडणूक आपण कोणत्याही परिस्थितीत लढविणार असल्याचे स्पष्ट करीत माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी शेवटी 'माझं ठरलंय' एवढीच प्रतिक्रिया दिली.

---------------------------------------

       माजी खासदार सुधाकर शृंगारे हे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून शहरात चालू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी लावलेल्या अनेक बॅनर वर भाजपच्या कोणत्याही नेत्यांचे फोटो नसून त्यांचे एकट्याचेच फोटो झळकत असल्याने ते तुतारी हाती घेणार का? ही चर्चा अधिक प्रमाणात होत आहे.  दरम्यान त्यांनी आपण विधानसभा निवडणुकीत निश्चित उमेदवार असल्याचे खात्रीपूर्वक संगितले आहे. तुतारी कडून ते निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार सुधाकर भालेराव यांचे भविष्य काय राहणार? याची चर्चाही जोर धरत आहे.