निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीवर निष्ठावंत नेत्यांची थाप..... ( विक्रम हलकीकर )

निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीवर निष्ठावंत नेत्यांची थाप.....

( विक्रम हलकीकर )



राजकारणात काम करीत असताना केवळ कार्यकर्ताच निष्ठावंत राहून चालत नाही तर नेता पण तसाच निष्ठावंत असला पाहिजे. दोघेही खरे निष्ठावंत असतील तरच संघटनेला खऱ्या अर्थाने बळ मिळत असते. नाही तर अलीकडे  'निष्ठा'वंता पेक्षा 'निसटा'वंताची यादी मोठी झालेली पहावयास मिळत आहे. मग तो नेता असो की कार्यकर्ता. पण उदगीर शहरात आपल्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन त्या नेत्यांनेही आपल्या कार्यकर्त्याप्रती आपली असलेली निष्ठा दाखवून दिली आहे. हा नेता म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कार्यकर्ता म्हणजे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.

       राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार होऊन भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ते जिल्हा पातळीवर नेता म्हणून ज्यांनी अनेक वर्षे निष्ठेने काम केले त्या स्व. नागनाथ निडवदे यांचे सुपुत्र असलेल्या अमोल निडवदे यांनीही भारतीय जनता पक्षासोबत आपली नाळ जोडून ठेवली. स्व. नागनाथ निडवदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघर्षाच्या काळात तत्कालीन प्रस्थापितांशी संघर्ष करून पक्षाचे संघटन वाढविण्याचे काम केले. पक्षाला यश मिळवून देण्यासाठी त्यांनी अत्यंत निष्ठेने काम केले. त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना पक्षाने भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची दोनदा जबाबदारी दिली. शिवाय गोदावरी खोरे विकास महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली.

स्व. नागनाथ निडवदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पक्ष संघटनेत काम केल्यामुळे त्यांचे एकमेकांशी स्नेहबंध चांगले जुळलेले होते. देवेंद्र फडणवीस पक्षाचे राज्यपातळीवरील नेते तर निडवदे जिल्हा पातळीवरील.

फडणवीस यांनी पक्षातील नेते व कार्यकर्ते यांच्यातील अंतर कमी होऊ न देता नेहमीच काम केले आहे. त्यामुळेच आज पक्ष संघटनेत फडणवीस यांना मानाचे स्थान आहे. 

स्व. निडवदे यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र अमोल निडवदे यांनीही वडिलांचा राजकीय व सामाजिक वारसा पुढे नेण्याचे काम सुरू केले आहे. राजकारणात नवखे असताना यांना कोण पाठबळ देणार? असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र अमोल निडवदे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच पक्षाची निष्ठेने सेवा सुरू केली. त्यांची निष्ठापूर्वक काम करण्याची पद्धत पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा त्यांना विश्वास दिला. त्या विश्वासाच्या जोरावर अमोलनी आपल्या कामाचा आवाका वाढविला. पक्षाच्या संघटन वाढीसाठी काम करणाऱ्या या नवतरुणावर भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची व धाराशिव च्या प्रभारीची जबाबदारी देण्यात आली.  या दोन्ही जबाबदाऱ्या अमोल यांनी सक्षम पणे पेलण्याचे काम केले आहे. पक्षाचा एक निष्ठावंत म्हणून त्यांनी काम केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 सप्टेंबर रोजी उदगीर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , केंद्रीय मंत्री रामदास आठवले व अन्य मंत्री देखील होते. 

पक्षाचा एक निष्ठावान  कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या अमोल निडवदे यांनी आपल्या नेत्याला घरी सदिच्छा भेट देण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करताना तेवढयाच निष्ठेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निडवदे यांचे निमंत्रण स्वीकारले व त्यांच्या घरी आपण एकटेच न जाता मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व अन्य मंत्र्यांनाही सोबत घेऊन गेले व आपल्यावर, पक्षावर निष्ठेने प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला.

कुठे  ते 'निस्टा'वंत नेते व कार्यकर्ते आणि कुठे हे निष्ठावंत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल निडवदे यांच्या घरी भेट देऊन केवळ त्यांचा सन्मानच केला नाही तर त्यांच्या पुढील राजकिय वाटचालीत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे दाखवून दिले आहे. हे ही तितकेच खरे.