माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?



उदगीर : लातूरचे माजी खासदार सुधाकर शृंगारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदगीर मध्ये चांगलेच ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शहरात मोठमोठी बॅनर लावली मात्र या बॅनर वर भाजपच्या कुठल्याही नेत्यांचे फोटो दिसत नव्हते. काल उदगीर येथे श्री गणेशाचे विसर्जन झाले. या विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले असताना शृंगारे यांनी स्वतःच्या स्वतंत्र व्यासपीठावरून गणेश भक्तांचे स्वागत केले. यामुळे माजी खासदार सुधाकर शृंगारे  यांच्या मनात नेमके चाललंय तरी काय? असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर प्रथम खासदार झालेल्या सुधाकर शृंगारे यांना पक्षाने अंतर्गत मोठा विरोध असताना देखील दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत झालेला पराभव शृंगारे यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत झालेला पराभव हा स्वकीयांमुळेच झाला आहे अशी त्यांची भावना आहे. जरी ते आज याबाबत उघड बोलत नसले तरी, आगामी काळात त्याबद्दल आपण बोलू असे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे.

आगामी विधानसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार सुधाकर शृंगारे हे उदगीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र याबाबत माजी खासदार सुधाकर शृंगारे आज घडीला स्पष्ट बोलायला तयार नाहीत. 

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित श्री गणेशाचे शुक्रवारी मिरवणुकीद्वारे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आपापले स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही स्वागत कक्ष उभारण्यात आलेल्या असताना माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी आपले स्वतंत्र व्यासपीठ उभारून तेथून गणेश भक्तांचे स्वागत केले. त्यांनी स्वतंत्र व्यासपीठ उभारल्याने राजकीय जाणकारांत चर्चा सुरू झाली असून माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या मनात नेमके चाललंय तरी काय? अशी चर्चा जोर धरत आहे.