विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक

उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही

उदगीर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून उदगीर विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडेच राहिला पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांच्याकडे पक्षश्रेष्ठींकडे आमची मागणी मांडून हा मतदारसंघ भाजपला सोडवून घ्यावा अशी आग्रही मागणी केली आहे.
गत विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना डावलून नवख्या असलेल्या डॉ. अनिल कांबळे यांना भाजपने उदगीर मतदार संघातून उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांना उमेदवारी मिळाली होती. या लढतीत ना. बनसोडे विजयी झाले. मात्र पराभूत झालेल्या डॉ. अनिल कांबळे यांना नवखे असतानादेखील 75 हजारा पेक्षा अधिक मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज्यात दोनदा सत्ताबदल झाला आणि या दोन्ही सत्तेमध्ये उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. आज घडीला भाजप-सेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू असून महायुतीमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सुटणार असून ना. संजय बनसोडे हेच उमेदवार राहण्याची शक्यता असल्याने भाजपचे माजीं आमदार सुधाकर भालेराव यांनी आपली राजकीय सोय म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
माजी आमदार सुधाकर भालेराव यांचे झालेले पक्षांतर व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पक्ष कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मपाल नादरगे, डॉ. प्रकाश येरमे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, शहराध्यक्ष मनोज पुदाले, सुधीर भोसले, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उषा माने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पक्ष कार्यकर्त्यांनी आपली भूमिका व्यक्त करीत असताना उदगीर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात भाजपचा मोठा जनाधार असून या मतदारसंघात तीनदा भाजपचा आमदार मतदारानी निवडुन दिला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद अशा अनेक संस्थांवर भाजपने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. भाजपचे हे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपसाठी सोडवून घ्यावा अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांच्याकडे केली.
यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन आपण पक्षश्रेष्ठींकडे उदगीर मतदार संघ भाजपकडे सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली.