प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव

प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव



उदगीर : गेल्या वीस वर्षांपासून उदगीर मतदार संघात काम करीत असताना जी प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी आपल्यासोबत जोडली गेली अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करीत असल्याची माहिती सुधाकर भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. 

उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे मागच्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा मागच्या काही दिवसांपासून जोर धरत होती. आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीर विधानसभा मतदार संघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची अधिक शक्यता असल्याने आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही याची खात्री असल्याने माजी आमदार सुधाकर भालेराव हे लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून च पक्षांतराच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातही त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावरून पक्षाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे माजी आ. भालेराव हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला बळ मिळत होते. 

दि. 11 जुलै 2024 रोजी माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश होणार आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी माजी आ.भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षातआपल्यामुळे काही नेत्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. आपण गेल्या वीस वर्षांपासून उदगीर विधानसभा मतदार संघात काम करीत असून हजारो प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी आपल्याशी जोडली गेली आहे. ही कार्यकर्त्यांची फळी आजही आपल्यासोबत प्रामाणिकपणे काम करण्यास तयार असून अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत आपण त्या पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे माजी आमदार भालेराव म्हणाले.