राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा



लातूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहारचे उद्घाटन 30 जुलै रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज येथे केल्या.

राष्ट्रपती महोदया यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ना. बनसोडे बोलत होते. माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, भदंत डाॅ. उपगुप्त महाथेरो, भंन्ते पय्यानंद, भन्ते नागसेन बोधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती महोदया यांच्यासह जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मान्यवरांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळाला भेट देवून आवश्यक पूर्वतयारीचा आढावा घ्यावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये यामध्ये कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे ना. बनसोडे म्हणाले. या दौऱ्याच्या अनुषंगाने सर्व पूर्वतयारी विहीत कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

राष्ट्रपती महोदया यांचा दौरा लातूर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या दौऱ्याची पूर्वतयारी योग्यप्रकारे करावी, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दौरा पूर्वतयारीच्या अनुषंगाने सूचना दिल्या. राष्ट्रपती महोदया यांच्यासह जिल्ह्यात येणाऱ्या विविध मान्यवरांच्या दौऱ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकांच्या कामांचा यावेळी साविस्तर आढावा घेण्यात आला.