साहित्य संमेलनाचे यजमानपद हा जिल्ह्याचा सन्मान : माजी मंत्री निलंगेकर

साहित्य संमेलनाचे यजमानपद हा जिल्ह्याचा सन्मान : माजी मंत्री निलंगेकर


उदगीर : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाला मिळालेले यजमानपद हे जिल्ह्याचा सन्मान आहे असे प्रतिपादन लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
उदगीर येथील ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयास आ. निलंगेकर यांनी सदिच्छा भेट देऊन संमेलनाच्या तयारीबाबत आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा संमेलन कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तथा मसाप अध्यक्ष रामचंद्र तिरुके, संस्था सचिव प्रा.मनोहर पटवारी, सहसचिव डॉ.श्रीकांत मध्वरे, सदस्य डॉ.रामप्रसाद लखोटिया, साहित्य संमेलनाचे समन्वयक दिनेश सास्तूरकर, प्र. प्राचार्य आर.आर.तांबोळी, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, भाजप शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगरसेवक राजकुमार मुक्कावार, सचिन हुडे, माजी सभापती बापूराव राठोड, प्रा.पंडित सुर्यवंशी, मंगेश पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी मंत्री आ. निलंगेकर म्हणाले की, साहित्य संमेलनाचे यजमानपद जिल्ह्याला मिळणे अभिमानास्पद बाब आहे. लातूर जिल्हा ज्ञानाची खाण म्हणून देशात लौकीक पात्र आहे. लातूर पॅटर्नची सुरुवात उदगीर, अहमदपूर येथून झालेली आहे. शिक्षणाला संस्कृतीची जोड असल्याशिवाय प्रगती होणार नाही. जिल्ह्यातील नेतृत्वाने प्रगल्भ राजकीय संस्कृती जपलेली आहे. संतभूमी मराठवाड्याचे महत्वपूर्ण योगदान आहे. आयोजकाने दिलेली जबाबदारी पूर्णक्षमतेने पेलू असा आत्मविश्वास व्यक्त करुन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. माजी विद्यार्थ्यांनाही संमेलनाच्या आयोजनात सहभागी करुन घ्यावे, अशी अपेक्षाही यावेळी आ. निलंगेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना तिरुके यांनी साहित्य संमेलनास राजाश्रय हवा असे सांगून संमेलन सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी होत आहेत. संमेलनाचे यजमानपद जिल्ह्याला असल्याने जिल्हा परिषदेमधून निधी देण्याची मागणी केली.
प्रा. पटवारी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन सर्वसमावेशकतेने संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे म्हणाले, साहित्यसंमेलनाच्या नियोजनासाठी निधी व यंत्रणा कामाला लावण्यात येईल.
माजी नगराध्यक्ष बागबंदे म्हणाले, पक्षाचे नगर सेवक, कार्यकर्ते तनमनधनाने संमेलन आयोजनास मदत करतील.
अध्यक्षीय समारोपात नागराळकर यांनी साहित्यातून सुसंस्कृत मने घडवली जातात. सर्वसामान्याच्या आश्रयावर उभारलेल्या महाविद्यालयाच्या हीरकमहोत्सवाचे औचित्य साधुन हा सोहळा आयोजित केला असल्याचे सांगत,, जीवनाच्या सर्व क्षेत्रात या महाविद्यालयाने उत्तुंग कामगिरी करणारे मनुष्यबळ देशाला दिले आहे असे सांगितले.
सुत्रसंचलन उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले आभार प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी मानले.