संगनबसव स्वामी चरपट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न....  

संगनबसव स्वामी चरपट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न....



निलंगा:- निलंगा येथील संगन बसव विरक्त मठात आयोजित निरंजन चरपट्टाभिषेक सोहळा कार्यक्रमात श्री. बसवेश्वर येरटे यांना नूतन मठाधिपती म्हणून समाज सेवेची विधीवत दिक्षा देण्यात आले. कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत चरपट्टाभिषेक सोहळ्याचा धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम उत्साही वातावरणात साधेपणाने साजरा करण्यात आला.


 निलंगा येथील श्री संगनबसव स्वामी विरक्त मठाच्या मठाधिपती पदी श्री. बसवेश्वर येरटे यांना नियुक्त करून अधिकार पत्र देण्यासाठी गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर 2020 रोजी निरंजन चरपट्टाभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बसवलिंग पटदेवरु भालकी, कोरणेश्वर महास्वामीजी उस्तुरी, डॉ. गुरुबसव महास्वामीजी पांडोमट्टी कर्नाटक, शिवबसव महास्वामीजी बेलूर, शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर आनंतपाळ , सिद्धलिंग महास्वामीजी देवणी, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे उत्तराधिकारी राजशेखर स्वामी ,आचार्य गुरुराज स्वामी अहमदपुरकर यांच्या मुख्य उपस्थितीत विधीवत धार्मिक कार्यक्रम घेऊन श्री. बसवेश्वर येरटे यांना निरंजन चरपट्टाभिषेक सोहळ्यात श्री.संगनबसव महास्वामीजी म्हणून घोंगडी,काठी, कमंडलू ,भगवी झोळी व महात्मा बसवेश्वर यांच्या वचन साहित्याचे पुस्तक देऊन समाजसेवेची दीक्षा देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगनबसव स्वामी विरक्त मठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष लिंबन महाराज रेशमे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, किर्तनकेसरी भगवंतराव पाटील चांभरगेकर ,मन्मथप्पा पालापुरे, विरूपाक्षेश्वर शंकद स्वामी, शंकरराव मोरगे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे ,पट्टाभिषेक सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे ,उपनगराध्यक्ष मनोज कोळळे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना कोरणेश्वर महास्वामी म्हणाले नूतन मठाधिपती बसवेश्वर महास्वामीजी हे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या आचार विचाराचे वारसदार व पाईक आहेत. त्यांनी जंगम तत्त्वानुसार लिंगायत धर्माचे प्रचार व प्रसाराचे कार्य करावे.जंगम ही जात नसून ती एक आचार पध्दती आहे. लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या आचार विचारांचे व वचन साहित्यातील मूल्यांची जोपासना करण्यासाठी नूतन मठाधिपतीनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना बसवलिंग पट्टदेवरु म्हणाले नूतन मठाधिपतींवर अहमदपूरकर महाराजांचे संस्कार झाले आहेत. त्यांनी आज आपल्या रक्ततसंबंध व नातेसंबंधाचा त्याग करून समाजासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा संकल्प केला आहे. धर्मप्रचार व समाजसेवा करून माणुसकीचा धर्म जोपासावी असे ते म्हणाले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नूतन मठाधिपती संगण बसव महास्वामी म्हणाले स्वामी विवेकानंद व महात्मा बसवेश्वरांच्या ग्रंथाचे वाचन केल्यामुळे व तसेच आईवडिलांनी केलेल्या आध्यात्मिक संस्कार यामुळेच माझ्या जीवनात परिवर्तन झाले आहे. भगव्याच्या संगतीत राहिल्यामुळे भगवा झालो आहे. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या आज्ञेनुसार निलंगा येथील श्री संगनबसव स्वामी विरक्त मठाच्या मठाधिपती पदी विराजमान झालो आहे. यास समाज व विश्वस्त मंडळानी पाठींबा व संमती दिली आहे. अहमदपूरकर महाराजांचा विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांच्या विश्वासाला विश्वासाला पात्र होण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बसवेश्वर नावाला कलंक लागेल असे वर्तन माझ्या हातून होणार नाही. आजच्या निरंजन चरपट्टाभिषेक सोहळा कार्यक्रमातील समाजसेवा दीक्षा व शपथेशी एकनिष्ठ राहून समाजसेवा करत राहीन. मठाचे सर्व स्थावर मालमत्ता ही समाजाच्या व विश्वस्त मंडळाच्या मालकीची असून मठाधिपती या नात्याने मी समाजसेवेच्या माध्यमातून मठाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन त्यांनी याप्रसंगी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी प्रयत्न केले. यावेळी नूतन मठाधिपती श्री.संगनबसव महास्वामी यांचा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वतीने अरविंद पाटील निलंगेकर यांनी तसेच विश्वस्त मंडळ, लिंगायत सेवा संघ यासह विविध संस्था व संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.