उदगीरात दत्तात्रय वट्टमवार यांचे फेसबुक अकाउंट झाले हॅक : अनेकांना आले पैशाच्या मदतीसाठी संदेश: फेसबुक ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज

उदगीरात दत्तात्रय वट्टमवार यांचे फेसबुक अकाउंट झाले हॅक : अनेकांना आले पैशाच्या मदतीसाठी संदेश


फेसबुक ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज


उदगीर (विक्रम हलकीकर): उदगीर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असलेले दत्तात्रय वट्टमवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले असून हॅकरने फेसबुक मेसेंजर वरून अनेकांना पैशाची मदत मिळावी म्हणून संदेश टाकले आहेत. याबाबत संदेश आलेल्या फेसबुक अकाऊंट धारकांनी दत्तात्रय वट्टमवार यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधल्यास त्यांचे फेसबुक हॅक झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान असे प्रकार वाढत असल्याने फेसबुक वापरणाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.


उदगीर येथील हावगीस्वामी महाविद्यालयाच्या जवळ दत्तात्रय वट्टमवार यांचे किराणा दुकान आहे. दत्तात्रय वट्टमवार या नावाने फेसबुक अकाऊंट आहे. दोन दिवसांपासून त्यांचे सदरील फेसबुक अकाउंट हॅकरने हॅक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या फेसबुकवरील अनेक फ्रेंड्सला फेसबुक मेसेंजर वरून कसे आहात, असे विचारून माझ्या मित्राची पत्नी गंभीर आजारी आहे, त्यांच्या मदतीसाठी पैसे हवे आहेत, आपण मदत करा असे संदेश टाकण्यात आले आहेत. यात कुणाकडे पाच हजार तर कुणाकडे दहा हजार रुपये मागितले आहेत. ही रक्कम गुगल पे द्वारे पाठविण्यात यावी असे सांगून 8395944564 हा भ्रमणध्वनी क्रमांक ही दिला आहे. वट्टमवार यांच्या फेसबुक वरील मित्रांनी त्यांना अशा प्रकारचे संदेश आल्यानंतर त्यांच्याशी व त्यांच्या परिवाराशी संपर्क साधून कोणी अडचणीत आहे का याची चौकशी केली असता त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 


----------------------


दरम्यान आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दत्तात्रय वट्टमवार यांनी फेसबुकवरील अनेक मित्रानी फोनवरून अडचणीत आहे का असे विचारून आलेल्या संदेशबद्दल माहिती दिली, तेव्हा आमचे फेसबुक हॅक झाल्याचे कळाले. कोणीही सदरील हॅकरच्या संदेशावरून कोणतीही मदत करू नये असे सांगितले. 


-----------------------


दरम्यान या संदर्भात फेसबुकबद्दल माहिती देताना मोबाईल वितरक राहुल वट्टमवार यांनी मोबाईल वर फेसबुक चालविणाऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मोबाईलवर फेसबुक चालवीत असताना सातत्याने त्याचा पासवर्ड बदलून हे अँप वापरावे. विशेषतः महिला भगिनी मोबाईलवर फेसबुक चालवीत असताना आपल्या अनेक फोटो अपलोड करीत असतात. त्या फोटो टाकण्याचे टाळावे, जेणेकरून हॅकर्स कडून करण्यात येणारा गैरवापर टाळता येणार आहे.