लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज शहरात तोबा गर्दी

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज शहरात तोबा गर्दी


उदगीर: उद्या दि. १५ जुलै पासून ३१ डिसेंबर पर्यंत लॉकडाऊन चालू होणार असल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांनी आज शहरात खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. यावेळी कोणाला ना सोशल डिस्टन्स चे भान नव्हते ना कोणाला आपल्या जीवाची पर्वा नव्हती.


देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन लागू करून नागरिकांना घराबाहेर येण्यास बंदी घातली होती. त्याचा परिणाम कोरोनावर आळा घालण्यास मदत झाली. तद्नंतरच्या काळात लॉकडाऊन दोन व तीन नंतर सरकारच्या वतीने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत हळूहळू व्यवहारांना मुभा दिली. हे सर्व व्यवहार करीत असताना सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र कुठेही हे आदेश पाळले गेले नसल्याचे निदर्शनास येत होते. शिवाय जिल्हाबाहेरून येणाऱ्यांची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम कोरोनाचे रुग्णात वेगाने वाढ झाली. आज लातूर जिल्ह्यात सहाशेच्या वर कोरोना बाधित रुग्ण वाढले असून मयताच्या संख्येतही वाढ होत आहे.


वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उद्या दि. १५ जुलै ते ३१ जुलै पर्यंत कडक लॉक डाऊन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.


उद्यापासून पंधरा दिवस कडक लॉक डाऊन होणार असल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केली होती. किराणा, कपडा, चप्पल, बूट, आदींसह सर्वच व्यापाऱ्याच्या दुकानांतून नागरिकांनी गर्दी करून सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पायदळी तुडविले आहेत. त्यामुळे आजच्या गर्दीतून आणखी कोरोना रुग्ण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.