इंदोरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घ्या: राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी


उदगीर : ह.भ.प. निवृत्ती महाराज यांच्यावर एका वक्तव्याचा संदर्भ देऊन दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने उदगीरच्या तहसीलदारांकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.


ह. भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी एका कीर्तनात केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देऊन त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खरे तर इंदोरीकर महाराजानी ग्रंथाचा आधार घेऊन ते वक्तव्य केले होते. तरीही त्यांनी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफीदेखील मागितली होती. मात्र केवळ वारकरी संप्रदायाला बदनाम करण्यासाठी इंदोरीकर महाराजांच्या विरोधात तक्रार दिली आहे. इंदोरीकर महाराज यांच्यावर दाखल केलेला गुन्हा शासनाने मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे गोविंद श्रीमंगले, उदगीर तालुकाध्यक्ष आत्माराम महाराज कुमठेकर, तालुका उपाध्यक्ष योगेश पुरी महाराज शेल्हाळकर, सचिव संतोष गिरी महाराज येणकीकर, सहसचिव सुरेश मुरूमकर, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष माऊली महाराज, सरोजा गायकवाड, संगीता गायकवाड, उद्धव दंडे यांनी केली आहे.