सोयाबीन बियाणे उगवण झाली नसल्याने संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा: कृषी विभागाकडे प्रा.विवेक सुकने यांची मागणी

सोयाबीन बियाणे उगवण झाली नसल्याने संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा: कृषी विभागाकडे प्रा.विवेक सुकने यांची मागणी


*शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देण्याचीही मागणी*


उदगीर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कृषी दुकानदारांकडून चांगल्या,नामांकित कंपनीची सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतात सोयाबीनची पेरणी केली होती,परंतु पेरणीला आठ दिवस उलटून गेल्यावर ही सोयाबीन बियाणाची उगवण झालीच नाही,यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे,अगोदरच मोठ्या संकटाना सामोरे जात शेतकऱ्यांनी पेरणी केली याबाबत बियाणे न उगवण्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी कृषी विभागाकडे केल्या असून यामध्ये अनेक सोयाबीनच्या कंपन्याचे बियाणे डबल लेबल सर्टिफाइड असूनही शेतकऱ्यांनी पेरलेली बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणी करता सोयाबीनचे दर्जेदार बियाणे कृषी विभागाने त्वरित उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी लातूर चे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश सचिव प्रा.विवेक सुकने यांनी केली आहे.


खरीप हंगामामध्ये मृगनक्षत्रचा पुरेसा व समाधानकारक पाऊस पडला असल्यामुळे शेतकऱ्यांनी धावपळ करत सोयाबीनची पेरणी केली होती, परंतु पेरणी होऊनही सहा-सात दिवस झाल्यानंतर हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनचे बियाणे उगवतच नसल्यानं याबाबत शेतकऱ्यांनी दुकानदाराकडे धाव घेत या बाबत विचारणा करीत आहेत, दुकानदारांची सोयाबीन बियाणे खरेदीची पावती असतानाही दुकानदार हात वर करून हा सर्व प्रकार संबंधित कंपनीवर ढकलत आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारीचा मार्ग अवलंबला आहे,परंतु कृषी विभाग देखील प्रत्येक शेतकऱ्यांना शेतावर जाऊन पंचनामा करण्यास वेळ लावत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी विभागाला प्राप्त तक्रारीची शहानिशा करण्यासाठी कृषी विभागाने जास्तीत जास्त पथकाची स्थापना करून नुकसान झालेल्या शेताची पाहणी करून पंचनामा करावा व नुकसानीचा अवहाल तयार करून संबधित कंपनीकडून शेतकऱ्यांना पेरणी करता सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून द्यावे व दिलासा द्यावा.पहिल्याच पेरणीकरता बियानाची शेतकऱ्यांकडे सोय नसताना आता दुबार पेरणी करण्याची शेतकऱ्यांना वेळ आली आहे. शेतकऱ्यांची बोगस,दर्जाहीन, न उगवणारे बियाणे देऊन फसवणूक करणाऱ्या सर्वच संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणीही प्रा.विवेक सुकने यांनी केली आहे.