जनतेच्या स्वास्थ्यासाठी पोलिसांनी विसरली तहान आणि भूक नागरिकानो विनाकारण रस्त्यावर येऊ नका उदगीर (विक्रम हलकीकर) देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव दररोज वाढत असून आपल्या शहरातील नागरिकांना या विषाणू ची बाधा होऊ नये व जनतेचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी उदगीरच्या पोलिसांनी तहान व भूक विसरली असून पोलीस तुमच्यासाठी रस्त्यावर उन्हातान्हात उभे आहेत, तेव्हा नागरिकानो आता विनाकारण रस्त्यावर येऊ नका असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. [ ] कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या आठ दिवसापासून दैनंदिन वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली. कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक मोठ्या प्रमाणात विनाकारण रस्त्यावर येत आहेत. शहरातील नागरिकांना या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी गेल्या आठ दिवसापासून उदगीरची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी यापूर्वीच कर्नाटक सीमा सील करून इतर राज्यातुन नागरिक उदगीरकडे येणार नाही याची काळजी घेतली. गेल्या आठ दिवसापासून शहरातील मुख्य रस्त्यावर उन्हातान्हात थांबून पोलीस कर्मचारी नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास अटकाव करीत आहेत. मात्र अनेक टवाळखोर युवक व काही नागरिक काही तरी निमित्ताने रस्त्यावर येत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. [ ] पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कुटुंबाचा विचार न करता नागरिकांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी आपली भूक व तहान विसरून रस्त्यावर थांबून आहेत. आज परिस्थितीत पोलीस हे जनतेसाठी देवदूत असून जनतेनी त्यांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. [ ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच सांभाळणे आवश्यक असून आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत तुम्ही घरातच बसून सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर व पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी केले आहे.