आरोग्य व रेशनिंग व्यवस्थेची आ. निलंगेकर यांनी घेतली माहिती  जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक  राठोडा येथील 'ते' साधक सुरक्षित

आरोग्य व रेशनिंग व्यवस्थेची आ. निलंगेकर यांनी घेतली माहिती


 जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक 


राठोडा येथील 'ते' साधक सुरक्षित


 निलंगा:  कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्यासोबत बैठक घेऊन आरोग्य यंत्रणा व रेशनिंग व्यवस्थेबाबत माहिती घेतली. आरोग्य यंत्रणा गतिमान करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास केल्या .
जिल्ह्यात कोरोना आजाराबाबत सतर्कता बाळगली जात आहे. लॉकडाऊन व संचारबंदी आहे. या स्थितीत आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने काम करत आहे याची माहिती घेऊन ती अधिक गतिमान करण्याची मागणी आ. निलंगेकर यांनी केली. रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज असून प्रत्येक गरजूला अन्नधान्य मिळावे याची खबरदारी घ्यावी ,अशा सूचना त्यांनी केल्या.


लॉकडाऊन मुळे दिव्यांग व्यक्तींची मोठी गैरसोय होत आहे. अशा व्यक्तींना शासनाच्या वतीने मिळणारे सर्व लाभ आणि सुविधा घरपोच देण्यात याव्यात असेही ते म्हणाले. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोना रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे .सध्या बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेसह इतर सर्व बँकांना काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे  निर्देश द्यावेत अशी सुचनाही आ.निलंगेकर यांनी केली .


सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे निलंगा तालुक्यातील राठोडा येथे वास्तव्यास असणाऱ्या महानुभाव पंथाच्या साधकांच्या तंबूचे नुकसान झाले आहे. लॉक डाऊनमुळे हे साधक तेथे अडकले असून प्रशासनाने त्यांच्यासाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती केलेली आहे. कालच्या पावसाने झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी सुचनावजा मागणी आपण प्रशासनाकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. या साधकांना त्यांच्या मूळ आश्रमात पोचवण्याची मागणी आपण प्रशासनाच्या माध्यमातून राज्यशासनाकडे केली आहे .या सर्व साधकांची नियमित आरोग्य तपासणी केली जात असून ते सुरक्षित असल्याचेही आ. निलंगेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.