मराठीला अर्थार्जनाची भाषा करणे हे खरे आव्हान... धनंजय गुडसूरकर ................................... उदगीर भाषेचा होणारा ऱ्हास हा केवळ त्या भाषेचा नसून मानवी सृजनशीलतेचा असतो. भाषा वाचविण्यासाठी बोलणाऱ्याची नाहीतर त्यांच्या कृतीची आवश्‍यकता असून मराठीला व्यवहाराची व अर्थार्जनाची भाषा करणे हेच खरे आव्हान आहे असे मत भाषाभ्यासक धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केले. ते जिल्हा व सत्र न्यायालय, उदगीर आयोजित मराठी भाषा दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्य जिल्हा न्यायाधीश अजय गुजराती यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश एन. के. मनेर, सुभेदार, न्यायाधीश गिरी, न्यायाधीश झाटे, न्यायाधीश राऊत, न्यायाधीश दिवाकर व वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना धनंजय गुडसूरकर म्हणाले की, मराठी भाषा अभिजात दर्जा पासून अजूनही वंचित आहे. भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रत्येक मराठी माणसांनी प्रयत्नशील असले पाहिजे. मातृभाषेतूनच शिक्षणाचा आग्रह आपण धरला पाहिजे. खोट्या प्रतिष्ठेसाठी परभाषेचा वापर करू नका. आपण ज्या भाषेत जन्मलो, वाढलो त्या भाषेचे आपल्यावर अनंत उपकार असून ते फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे ते म्हणाले. आपण दररोज मराठी बोलताना अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. हे चुकीचे असून जास्तीत जास्त मराठी शब्द आपल्या भाषेत कसे वापरता येतील हा आग्रह आपण धरला पाहिजे. मराठी भाषेतील मासिके, वर्तमानपत्रे, विविध ग्रंथ प्रत्येकाने वाचली पाहिजेत. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इतरांना पुढे न करता स्वतःपासून सुरुवात करावी असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. अध्यक्षीय समारोप करताना मुख्य जिल्हा न्यायाधीश अजय गुजराती म्हणाले की, न्यायालयीन कामकाजाची भाषाही आता मराठी झाली असून प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषा बोलली पाहिजे. तरच मराठी भाषेचे संवर्धन व भाषेची अभिवृद्धी होईल. असे मत मांडून त्यांनी मराठी भाषेच्या साहित्याची थोरवी सांगितली. कार्यक्रमाचे संचालन महेश मळगे यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वकील व भाषाप्रेमींची उपस्थिती होती.